सामाजिक भान

सामाजिक भान

ख्रिस्तात सर्वांना सलाम,
आज आपण ‘सामाजिक भान‘ या विषयी बोलू.

आपणास हे माहित आहे का, कि, मदरशांमध्ये काय शिकविले जाते वा सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) च्या शाखांमधून काय शिकविले जाते? बहुतांशी नाही माहित. कारण?
कारण अशा प्रकारची माहिती, माहित करून घेण्याची गरजच काय? हो ना?
बरोबर आहे तुमचे म्हणणे. पण त्याच बरोबर आपणास हे हि जाणवेल कि, अशाच प्रकारे, चर्च मध्ये काय चालते व काय शिकविले जाते ते देखील ख्रिस्तेतर बांधवाना माहित असणेची शक्यता तेवढीच कमी आहे ना?

दर रविवारी आपण चर्च मध्ये काय करितो. प्रार्थना, उपासना गीते, शास्त्र वाचन, दानार्पण, संदेश,  आशीर्वाद. या सर्व उपासने मध्ये, इत्तर धर्मांबद्दल द्वेष अथवा तेढ निर्माण होण्याजोगे साधे संदर्भहि  नसतात उलटपक्षी आपण आपल्या देशा बद्दल, देशवासिया बद्दल, राज्यकर्ते व अधिकार्यांबद्दल आपल्या देवाकडे अभिष्ट चिंतितो. सर्वांना सुखी समाधानी ठेव, या साठी प्रार्थना करितो. हे सर्व आपल्या एवढे अंगवळणी पडलेले आहे कि, तुम्हाला हे वाचतानाच  असे वाटेल कि, मग ह्यात सांगण्याजोगे काय आहे.

प्रीयांनो, आपण ख्रिस्ती लोंक खरोखर असेच आहोत तर, इत्तर समाज आम्हाला ‘धर्मांतर’ करणारे लोक म्हणून का संबोधितात? आपली अशी प्रतिमा का? आपल्या विषयी गैरसमज असणे यास, गैरसमज करून घेणाऱ्यापेंक्षा, आपणच अधिक सतर्क असणे हे महत्वाचे आहे. कारण झालेच तर नुकसान आपलेच आहे. आणि गैरसमज हा अपुरी माहिती व चुकीची माहिती या मुळे होतो, हे आपणस ठाऊक आहे.

आपल्या विषयी असलेले त्यांचे  हे अज्ञान आपणास  पूरक तर नाहीच पण दिवसेंदिवस ते घातक बनत चाललेले आहे. हा गैरसमज जर राजकीय स्वार्थासाठी पसरविण्या येत असेल तर मग त्याचे दुष्परिणाम आपल्या कल्पेनेपेक्षा अधिक गंभीर व भयानक असतात. आणि त्याला जर धार्मिक रंग असेल तर प्रीयांनो, गोष्ठी आपल्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत असेच समजा.

प्रथम आपली प्रतिमा विपर्यास्त का झाली ते पाहू.

ख्रिसमस पार्टी म्हणजे मौजमज्जा, खाणे पिणे, नाच गाणी व धिंगाणा अशी प्रतिमा पण वस्तुस्तिथी काय आहे?  सर्व साधारण ख्रिस्ती कुटुंबामध्ये मद्य हे संपूर्णपणे वर्ज असते. गाणी हि केवळ आणि केवळ धार्मिकच वाजविली व ऐकवली जातात, चुकूनही कधी सिने संगीत तुम्हास ऐकावयास मिळणारच नाहीत. नवीन कपडे, स्वादिष्ठ भोजन, सर्वदूर पै-पाहुणे एकत्र येवून ख्रिस्त जन्माबद्दल कृतज्ञता व आनंद व्यक्त करतात. सर्व प्रकारे आनंदी आनंद असतो. मिष्टांना जसे, डोनट्स, केक्स, कुकीज. भोजनाच्या बाबतीत म्हणाल तर, कितीतरी ख्रिस्ती कुटुंबाच्या कुटुंब हे शुद्ध शाकाहारी आहेत व त्याप्रमाणेच, कितीतरी शुद्ध शाकाहारी धर्मप्रणालीमध्ये असलेल्या व्यक्तींना आपल्याकडे मांसाहार करावयास आवडते. म्हणूनच बायबल सांगते की जे तोंडावाटे आत जाते ते माणसाला विटाळवीत नाही, तर जे तोंड वाटे बाहेर येते ते माणसाला विटाळविते. असो.

मग ख्रिसमस पार्टी बदनाम का?

याला कारण विशेतः हिंदी सिनेमा मधील सादरी करण व त्या कडे पाहण्याची आपली निष्काळजी प्रवृत्ती या मुळे. ख्रिस्तेत्तरांना जर खरी वस्तुस्तिथी माहीत असेल तर आपल्या समाजा बद्दल कोणाच्याही मनांत कटुता निर्माण होणार नाही व आपली प्रतिमा अधिकाधिक शांतीप्रिय, सेवाभावी, अशीच बनेल.

प्रीयांनो, भारतातील ख्रिस्ती या नात्याने आपली सुयोग्य ओळख असावी. आपल्या बद्दलच्या असल्या प्रकारच्या अज्ञानाचा गैर फायदा कांही धर्मांध व्यक्ती, संस्था त्यांच्या वैयक्तिक व राजकीय स्वार्थ साठी करून घेत असतात. त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण केली जाते व त्या मध्ये त्यांचाच बळी दिला जातो.

वास्तविक पहाता, ख्रिस्ती समाज ही गरीब गाय आहे, मारकी म्हैस नव्हे.

ख्रिस्ती समाजाबद्दल इतर समाजामध्ये असहिष्णुता वाढीस लागणेस आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे, पुढील शास्त्र वचन. वचन अगदी योग्यच आहे, पण ज्या प्रकारे ते वचन पाळण्याचा व अंमलात आणण्याचा अट्टाहास केला जातो  त्याचा कदाचित पुनर्विचार करण्याची गरज आहे. ते वचन आहे, “तुम्ही जाऊन सर्व लोंकास माझे शिष्य करा व त्यांस बाप्तिस्मा द्या”. बऱ्याचदा शिष्यत्वाचे शिक्षण अपुरेच पण बाप्तिस्मा करण्याची घाई आणि चढाओढ दिसून येते. आणि मग चुकीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. या मध्ये केवळ बाप्तिस्मा करणारा व बाप्तिस्मा घेणारा बाधित होतो असे नाही तर संपूर्ण ख्रिस्ती समाजाला बदनामीला सामोरे जावे लागते व त्याची चुकीची प्रतिमा तयार होते. चांगली प्रतिमा तयार होणेस फार जास्त काळ लागतो, व प्रतिष्ठा धुळीस मिळणेस जास्त वेळ लागत नाही, हे आपणास ठाऊकच आहे.

या साठी करावे काय? तर सुवार्ता गाजवितांना, आता आपण विसाव्या शतकात आहोत याचे भान असू द्या. सुरवातीच्या काळातील मंडळी व मिशनरी लोकांची सुवार्ता गाजविण्याची पद्धत आता कालबाह्य झालेली आहे.

भारतीय घटनेने आपणास जेव्हढे धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे, तेवढेच धार्मिक स्वातंत्र्य इत्तर सर्व धर्माच्या लोकांना देखील दिलेले आहे. त्यामुळे सुवार्तिकांनी, सुवार्ता गाजविताना, इतर धर्मियांच्या भावना अजिबात दुखविल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाप्तिस्मा करीत असताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे, या युगात, ख्रिस्त आहे हे, केवळ बायबल मधील वाचनांद्वारे न मांडता, आपल्या कृतीद्वारे व वागणुकीद्वारे लोकांसमोर ठेवणे ही काळाची गरज आहे.

कुठल्याही प्रकारच्या गैरप्रचाराला इत्तर धर्मियांनी भिक घालू नये, तर त्यांनी सत्याचीच बाजू घ्यावी असे वाटत असेल तर, त्यासाठी आपल्याला कांही गोष्ठी जाणीवपूर्वक कराव्या लागतील.

सर्व साधारणपने इत्तर सर्व लोकांना ख्रिस्ती लग्न समारंभ व ख्रिसमस पार्टी बद्दल जबरदस्त उत्सुकता असते व इतर कोणत्याही प्रसंगा पेक्षा या दोन प्रसंगी इतर धर्मियांना आमंत्रण असनेची जास्त शक्यता असते. अश्या प्रसंगी आपल्या ओळखीच्या इतर धर्मियांना आर्जवून निमंत्रण द्या. त्यांना येऊन पाहूद्या कि, ख्रिस्ती लग्न समारंभ किती आनंदमय, पवित्र व गंभीर असतो. या मध्ये सर्व मंडळीचा कसा सहभाग असतो तो.

तसेच, आपल्या मंडळींच्या रविवारच्या उपासनेमध्ये, खास अख्रिस्ती बांधवांसाठी, विशेषतः इतर धार्मिक व राजकीय पुढाऱ्यां साठी एखाद्या राखीव जागेची व्यवस्था करून ठेवावी व त्यासाठी त्यांना आर्जवून निमंत्रित करावे. जेणेकरून आमंत्रितांना, चर्च ची उपासना काय असते, पाळकांचा उपदेश कशावर आधारित असतो, या विषयी माहिती होईल आणि त्यांच्या उपस्थितीचा उपासनेच्या पावित्र्याला व शिस्तीला क्षती पोहंचनार नाही अशी व्यवस्था करावी.

आपल्या वडिलाच्या अथवा आजोबांच्या वेळचा काळ पहा. ख्रिस्ती समाजाला एक आगळेवेगळे मानाचे स्थान होते. आपल्या सर्व संस्थांचा तो सुवर्ण युग होता. लोकांमध्ये आदर होता. आणि आज ख्रिस्तेतर लोक आम्हालाच विचारतात कि, तुमच्या संस्थांची ही दुरावस्था झालीच कशी. तुम्ही काय झोपला होतात का ? कदाचित हो.

पण या अवस्थेला येण्याच्या अनेक कारणांना पैकी एक प्रमुख कारण म्हणजे आम्हाला गरज नव्हती. किंबहुना आम्हाला गरज वाटली नव्हती. पण प्रियांनो, आज परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला या सर्वांची गरज वाटू लागलेली आहे. आमच्या दुरवस्थेची आम्हाला जाणीव झालेली आहे. व ख्रिश्चन समाज एका संक्रमावस्थेतून जात आहे. परिस्तिथी बिकट आहे, पण सुधारणेच्या पलीकडे अजून गेलेली नाही.

आपण समाज म्हणून एकत्र येण्याची गरज आहे.

आजही आपल्या समाज बद्दल भारतामध्ये एक सहानभूती आहे. ख्रिस्ती व्यक्तीकडून एका दर्जेदार सेवेची व कार्यक्षमतेची अपेक्षा केली जाते. किंबहुना, ज्या वेळी एखादी ख्रिस्त व्यक्ती दर्जेदार कामगिरी करते तेव्हा इतर लोकांना त्याचे फारसे आश्चर्य वाटत नाही, व त्याचे फारसे कौतुक पण होत नाही कारण ख्रिस्ती व्यक्तीकडून ते अपेक्षितच असते. या पेक्षा आपली कामगिरी कमी असेल तर, इतर समाज म्हणतो कि, हे खरे ख्रिस्ती नाहीत. हे तर केवळ समाजात आपल्याला स्थान असावे म्हणून स्वतःला ख्रिस्ती म्हणवितात. काही अंशी ते खरे देखील आहे. पण मुद्दा तो नाही.

समाज म्हणून आपले काय अस्तित्व आहे? हा मुद्दा आहे. सर्व समाजा मध्ये चांगले आणि वाईट लोक असणारच. पण एखाद्या समाजाची जी अति उच्च प्रतिमा असते ती कनिष्ठ स्तरावर येत असेल तर मात्र त्या बद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

ख्रिस्ती समाजाला एकत्र आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व त्यासाठी आवश्यक असणारे सर्व ते मार्ग प्रार्थनापूर्वक चोखाळावे लागतील.  त्या करिता कोणतेही चर्च अथवा कोणताही पंथ गृहीत न धरता, ख्रिस्ती व्यक्ती हा घटक मानून त्याला समाजाच्या एकाच चौकटीत आणण्याची धडपड करावी लागेल. कांही लोकांच्या मते, आपण संघटित झालेस, आपले अस्तित्व लोकांच्या डोळ्यात येईल  व आपल्या समजावरील हल्ल्यामध्ये वाढ होईल. आपल्यावरील अत्याचारात भर पडेल अशी भीती व्यक्त केली जाते. पण हे लक्षात घ्या कि, असे केव्हा होईल जेव्हा इतर लोकांना आपण त्यांचे शत्रू आहोत असे वाटेल तेव्हा. आणि इथेच तर आपण सावधान होणेची खरी गरज आहे. आपली प्रतिमा, आपल्या बद्दलचा इतरांमध्ये असणारा समजच आपणास योग्य ते न्याय मिळवून देईल.

आम्ही एकत्र येण्याचे व संघटित होण्याचा उद्देशच मुळी सर्वार्थनाने वेगळा आहे. ना आम्हाला आमची ताकद दाखवायची आहे, ना ही आम्हाला सर्व देश  ख्रिस्ती करावयाचा आहे. आंम्हाला केवळ येशू ख्रिस्ताची खरी प्रतिमा जगासमोर आणणेची आहे आणि ती देखील आमच्या वागण्याबोलण्यातून, आमच्या वर्तुणीकीतून, आमच्या आपल्या बांधवांबरोबरच्या व इतरांबरोबरच्या व्यवहारा द्वारे ख्रिस्ती  जगणे काय असू शकते हे दाखविण्या करीत एकत्र येणेच आहे. हे जेव्हा आपण परिणामकारकरित्या सर्वाना दाखवून देऊ तर तेव्हा आपण आपल्या अपेक्षित यशाच्या कितीतरी जवळ पोहंचलेले असू. जसे आपण आपल्या धार्मिक प्रतिमेची काळजी घेणार आहोत तसेच आपण आपल्या सामाजिक प्रतिमेची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्या मुळे संघटित होणे मागचा मूळ उद्देश हा अगदी सुस्पष्ट असावा व तो सर्वांना ज्ञात असावा.

संघटित होणे मागचा मूळ उद्देश सत्ता मिळविणे नाही, पैसे मिळविणे नाही, धर्माचा अवास्तव प्रचार करणे नाही, दुसऱ्या कोणत्याही धर्माचा अपमान करणेचा नाही, कोणत्याही धर्मप्रणालीच्या विरोधात नाही, कोणत्याही स्पर्धेत नाही, व कोणत्याही मुद्द्यावर आम्ही कोणाचे शत्रू नाही.

ख्रिस्ती समाजाचा उद्देश हा केवळ आम्हाला घटनेने दिलेले जन्मसिद्ध हक्क अबाधित राखण्या पुरते मर्यादित आहे. वास्तविक पाहता लोकशाहीत या मूलभूत हक्कासाठी लढावं लागतं हेच दुर्दव्य आहे. पण म्हणतात ना कि बाळ रडल्याशिवाय आई देखील त्याला दूध पाजत नाही. असो.

परंतु हि गोष्ट जेवढी स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचेल तेवढे कमी आपल्याला राजकीय, धार्मिक, सामाजिक  विरोधाला सामोरे जावे लागेल. आणि इथेच आपल्याला आपली प्रतिमा तयार करण्याची कसोटी आहे. त्या करीता आपणास सामाजिक भान असावे लागते.

ख्रिस्ती व्यक्ती हि सज्जन, देवाला भिऊन वागणारी असते, ती कायम तशीच राहणार, भले ती सार्वजनिक क्षेत्रात असेल अथवा वैयक्तिक जीवनात असेल. कारण आपण जगाचे मीठ आहोत. मिठाचा खारटपणा गेला तर त्याला मीठ म्हणताच येणार नाही म्हणजे तो ख्रिस्ती व्यक्ती म्हणून राहणारच नाही.

देव बाप आपण बरोबर असो. आमेन.

आपला ख्रिस्तात बंधू,

सॅमसन सोरटे,

अध्यक्ष, सेराफीम फाऊंडेशन, मिरज,  जिल्हा. सांगली

सेल फोन ९८८१७१५१०१७९७२९७८९३६

1 Comment

Post A Comment